बिहार निवडणूक अजित दादांचे पानीपत; सगळेच उमेदवार मागे!!

Foto
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. सत्ताधारी एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. सध्याच्या घडीला भाजप 85, तर संयुक्त जनता दल 76 जागांवर पुढे आहे. विरोधकांची धूळधाण उडताना दिसत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सध्या केवळ 34 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बिहारमध्ये पानीपत झालं आहे. अजित पवारांच्या एकाही उमेदवाराला छाप पाडता आलेली नाही.

बिहारमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांना बंपर यश मिळण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. भाजप प्रणित एनडीए बहुमताचा आकडा आरामात ओलांडताना दिसत आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यात सध्या नंबर एकचा पक्ष होण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. त्यात आताच्या घडीला तरी भाजप आघाडीवर आहे.

शरद पवार यांची साथ सोडत भाजप सोबत घरोबा करणारी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये 14 जागा लढवत आहे. या जागांवरील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. अजित पवारांच्या एकाही उमेदवाराला प्रभाव पाडता आलेली नाही. सगळ्याच जागांवर त्यांचे उमेदवार मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या एकाही उमेदवाराला अद्याप 500 मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. सगळ्या उमेदवारांमध्ये हा समान धागा आहे.
 अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढत असलेल्या सगळ्याच जागांवर पक्षाची बिकट अवस्था आहे. अजत पवारांच्या सगळ्याच उमेदवारांना अनेक अपक्ष उमेदवारांनीदेखील मागे टाकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना तर 100 मतांचा टप्पादेखील ओलांडता आलेला नाही.

बिहारमध्ये विविध मतदारसंघांत पक्षाने एकूण 15 उमेदवार केल्याची घोषणा केली होती. मात्र उमेदवारांना मिळालेली मत पाहता जनतेने त्यांना सपशेल नाकारलं आहे. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीकडील उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ५०० मतांचाही टप्पा पार करता न आल्याने ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. या 15 पैकी तब्बल 13 उमेदवारांना मिळालेली मते इतकी कमी आहेत की त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर मतदानाच्या सुरुवातीच्या दोन ते तीन फेऱ्यांमध्येच उमेदवारांची मते शंभरीदेखील पार न गेल्याचे आकडे सांगत आहेत.